जालना - वंचित बहुजन आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. शरदचंद्र वानखेडे यांच्या कार्यालयात उद्याच्या तयारीची गडबड सुरू झाली आहे. त्यांच्या कार्यालयात अनेक कार्यकर्ते मतदार यादी हाताळताना तसेच आपआपल्या बूथवरील जबाबदारीची पूर्वतयारी करताना दिसून आले.
गेल्या २० वर्षांपासून जालन्यामध्ये एकाच खासदाराची सत्ता आहे. त्यांनी आत्तापर्यंत जी कामे केलीत या कामांवर जनता समाधानी नाही. त्यामुळे जनतेलाही बदल हवा आहे. त्यामुळेच उद्याचे मतदान म्हणजे बहुजन वंचित आघाडीचा विजय असेल, असा विश्वास डॉ. वानखेडे यांनी व्यक्त केला.
समाजातील लहान-लहान घटकांनी वंचित बहुजन आघाडील पाठिंबा दिला आहे. प्रस्थापितांनी बहुजनांना सत्तेपासून वंचित ठेवल्यामुळे प्रस्थापितांविरुद्ध समाजात प्रचंड नाराजी आहे. याचा फायदा देखील वंचित बहुजन आघाडीला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.