जालना - जिल्ह्यातील पळसखेडा काळे येथे रविवारी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस पडला. मे महिन्याच्या शेवटच्या टप्यात उन्हाचा कडाका वाढला होता. मात्र, पाऊस पडल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर या पावसाने शेतकरी, तसेच ग्रामीण भागातील काही घरांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- 'द क्रू ड्रॅगन' अंतराळयान यशस्वी पोहोचले अंतराळ स्थानकात
रविवारी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व आलेल्या या पावसाने वाढलेल्या उन्हाच्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, त्याचबरोबर अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. विशेषकरुन ग्रामीण भागातील माती, पत्र्याच्या घरांचे या पावसात नुकसान झाले. वादळी वाऱ्याने काही घरावरील पत्रे उडाले. तर शेतकऱ्यांच्या शेतातील माल पावसाने भिजला.
तर राजूरपासून जवळच असलेल्या खामखेडा येथे सारंगघर नागवे यांच्या दुचाकीवर वीज पडली. यात दुचाकीचे नुकसान झाले असून वीज पडल्याने परिसरात आग लागली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.