जालना - सामुदायिक विवाह सोहळ्यात तब्बल चार अल्पवयीन मुलींचे विवाह थांबवण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले आहे. हे विवाह थांबवल्यामुळे आणि याचे दुष्परिणाम पालकांच्या लक्षात आणून दिल्याने या पालकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांचाच सत्कार केला आहे.
आठ तारखेला होणार होता सामुदायिक विवाह सोहळा
शहरातील लोधी मोहल्ला भागांमध्ये 8 डिसेंबरला रात्री सव्वानऊ वाजता सतरा जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार होता. या जोडप्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावला जात असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईन या सामाजिक संस्थेने पोलीस अधीक्षकांकडे 31 नोव्हेंबरला केली होती. या तक्रारीची दखल घेत सदर बाजार पोलिसांनी माहिती घेतली. ही माहिती घेत असताना त्या समाजातील ज्येष्ठ नागरिकांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता तब्बल एक नव्हे तर चार बालविवाह लावले जात असल्याचे दिसून आले.
तीन-चार दिवस या अल्पवयीन मुलींचे वयाचे दाखले जमा करण्यासाठी एक टीम नियुक्त करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या नियंत्रणाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा सानप, इर्शाद पटेल, परशुराम पवार, समाधान तेलंग्रे आदींचा समावेश होता. या सर्व टीमने सामुदायिक विवाह सोहळ्यात होणारे हे अल्पवयीन मुलींचे विवाह थांबवले आणि उर्वरित 14 जोडप्यांचे विवाह लावून दिले.
पारिवारिक अडचणींमुळे बालविवाह
चाईल्ड हेल्पलाईनच्या तक्रारीमुळे एक बालविवाह थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना चार बालविवाह थांबवण्यात यश आले. या चारही मुलींची पारिवारिक स्थिती सक्षम नसल्याने हे बालविवाह होत होते. कोणाला आई-वडील नाहीत तर कोणाची आर्थिक परिस्थिती नाही, अशा अन्य समस्यांमुळे हे विवाह होत होते.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या परिवारातील सदस्यांना बोलावून त्यांना कायद्याची बाजू समजावून सांगितली आणि या पालकांना देखील ते पटले आहे. त्यामुळे होणारे हे बालविवाह झालेच नाहीत. मात्र, या मुलींच्या भविष्याचा प्रश्न उज्वल केल्यामुळे चारही मुलींच्या पालकांनी आज सदर बाजार पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक संजय देशमुख आणि त्यांच्या टीमचा सत्कार केला.
चाईल्ड हेल्पलाईन
अशा प्रकारचे बालविवाह किंवा मुलांसंदर्भातील अनैतिक रूढी, प्रथा, परंपरा आढळून आल्यास कोणाला मदत हवी असेल तर, त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलीस प्रशासन यांच्यावतीने करण्यात आले आहे.