जालना : सहाय्यक फौजदाराने पोलीस मुख्यालयातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. मंगळवारी सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार गायकवाड हे आज सकाळी 8.45 वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशमुख, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
गायकवाड यांनी आत्महत्या का केली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसून, अधिक तपास सुरू आहे.