जालना - गोंदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत करण्यासाठी साडे पाच हजार रुपयांची लाच घेताना पोलीस हवालदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालन्यातील अंबड तालुक्यात असलेल्या गोंदी येथे ही कारवाई केली.
गुन्हा दाखल -
20 दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते. ही घटना ताजी असतानाच अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस हवालदाराला साडेपाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. अजयसिंग सांडूसिंग राजपूत (वय-55), असे आरोपीचे नाव आहे. 8 जूनरोजी ही कारवाई करण्यात आली. रात्री अकरा वाजेच्या सुमारास यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना घुसखोरीची सवय - आमदार लोणीकर
या प्रकरणातील तक्रारदाराच्या भावाविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून मोटरसायकलही जप्त केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत करण्यासाठी आणि मोटर सायकल सोडून देण्यासाठी पोलीस हवालदार अजयसिंग सांडूसिंग राजपूत यांनी साडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.