जालना (अंबड) - केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या अंबड तालुक्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर अंबड शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आज अंबड शहरातील महात्मा फुले चौकातील एका हॉटेलमध्ये बसलेल्या आठ ते दहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी अंबड पोलीस ठाण्यात नजर कैदेत केली आहे.
...म्हणून कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात -
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज अंबड दौऱ्यावर आहेत. अंबड शहरातून त्यांची मोटार सायकल रॅली निघणार आहे. तसेच शहरातील पंडित जळगावकर नाट्यगृहात त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम काही कॉंग्रेस कार्यकर्ते उधळून लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका हॉटेलमधून या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आहे. दरम्यान, पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेताच कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी सुरू केली होती.
दानवेंनी राहुल गांधीबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य -
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बदनापूर येथील कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करत 'राहुल गांधी सांड असून कोणत्याच कामाचे नाही' असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच 'लोक जनावरे जशी देवाला सोडतात, त्यानंतर ती जनावरे कोणत्याच कामाला चालत नाही, तसे राहुल गांधी असून ते पंतप्रधान पदासाठी निष्क्रिय आहे', असेही ते म्हणाले होते. त्यानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अंबड शहरात दानवे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात आला होता.
हेही वाचा - पुरोगामी महाराष्ट्रात जादूटोण्याच्या संशयावरून ७ जणांना बांधून मारहाण, या गावात तणावाचे वातावरण