जालना - दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझलचे दर वाढत आहेत. दर नियंत्रण हे सर्व सामन्य जनतेच्या हातात नाही. मात्र, इंधन वापरावर नियंत्रण शक्य आहे, यासाठी इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. दिनांक 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान 'सक्षम २०२१' या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इंधन विक्री करणाऱ्या भारत पेट्रोलियम कंपनीचे विक्री अधिकारी सतीश आहेरवाल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
असा असेल उपक्रम-
सक्षम 2021 ,अर्थात संरक्षण क्षमता महोत्सव हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे. जो ऊर्जा सुरक्षा, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केला आहे. पेट्रोलियम संवर्धन आणि संशोधन संघटनांनी पेट्रोलियम उत्पादनाच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत इंधन बचतीसाठी असलेल्या उपकरणांना प्रोत्साहनही दिले जाणार आहेत. यामधून सरकारला मदत करण्याची या कंपन्यांची अपेक्षा आहे. त्यानुसार हा महिना" हरित आणि आणि स्वच्छ ऊर्जा" म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
औरंगाबाद पर्यंत सीएनजीची सेवा-
सीएनजी पेट्रोल पंप अहमदनगर आणि औरंगाबाद येथे सुरू करण्यात आले आहेत. जालन्यासाठी अद्याप सीएनजीची मागणी न आल्याने पंपाचे काम सुरू झाले नाही. जशी मागणी वाढेल त्यानुसार हे पंप देण्याचा विचार केला जात असल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विविध उपक्रम -
या उपक्रमांतर्गत गॅस एजन्सी, पेट्रोल पंप, वाहनचालक संघटनांची मदत घेऊन इंधनबचतीसाठी स्पर्धा घेणे. तसेच शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना इंधन बचतीसाठी प्रवृत्त करणे, हा या मागचा उद्देश असल्याचेही अधिकारी म्हणाले. या पत्रकार परिषदेला एचपीसीएल कंपनीचे वरिष्ठ विभागीय विक्री व्यवस्थापक किशोर अकोल्या, भारत पेट्रोलियमचे सहाय्यक व्यवस्थापक सतीश आहेरवाल आणि औरंगाबाद विभागाचे गुणवत्ता निरीक्षक मनीभूषण यांची उपस्थिती होती.