जालना - नगरपालिकेने खासगी कंपनीला कंत्राट देऊन मालमत्तेबाबत केलेल्या सर्वेक्षणामध्ये मनमानी पद्धतीने कर आकारणी केली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांना कर आकारणीच्या विरोधात केलेल्या तक्रारींवर सुनावणीसाठी नगरपालिका कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.
खासगी कंपनीने केलेल्या सर्वेमध्ये एकाच घराची दोन वेळा कर आकारणी, पडक्या घरांना व्यवसायिक कर, व्यवसायिक दुकानांना घरपट्टी, अशा चुकीच्या पद्धतीने मालमत्ता कराची आकारणी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पालिकेमध्ये लेखी तक्रारी केल्या. या तक्रारींची संख्या लक्षात घेता सुनावणीसाठी त्यांना तीस टक्के रक्कम भरून अपील करण्यास सांगितले होते. ज्या नागरिकांनी अपील केले आहे अशा नागरिकांना सोमवार दिनांक १६ पासून सुनावणीच्या तारखा देण्यात आल्या. दर दिवशी ५०० तक्रारी अशा पद्धतीने ही सुनावणी होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी उपविभागीय अधिकारी न आल्यामुळे ही सुनावणी बारगळली आणि दिनांक १७ रोजी नगरपालिकेमध्ये याचिकाकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे पालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला होता.
अशा परिस्थितीतही सुमारे ६०० अपिलांची सुनावणी करण्यात आली. कालचा गोंधळ लक्षात घेता आज नगराध्यक्ष सौ. संगीता गोरंट्याल पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना सोबत घेऊन टेबलची संख्या वाढविण्यात आली. त्यामुळे कालपेक्षा आज कमी गोंधळ झाला. दरम्यान, पालिकेने आकारलेल्या या मनमानी करामुळे नगरसेवक नाराज आहेत आणि ही कर आकारणी चुकीच्या पद्धतीने असून याला अनेक नगरसेवकांचा विरोध आहे. लवकरच नवीन कर आकारणी करावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती नगरसेवक अशोक पांगारकर यांनी दिली. दरम्यान कर वसुली करण्यास आमचा विरोध नाही, उलट तो वसूल करावा हीच आमची अपेक्षा आहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने आणि अवास्तव कर वसुली करू नये, अशी जनतेची मागणी असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा- पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा, हॉटेल व्यावसायिकाचा आत्महत्येचा प्रयत्न