जालना - जुना जालना आणि नवा जालना, असे विभाजन करणाऱ्या कुंडलिकेच्या तीरावर नव्या जालन्यातील भागावर पंचमुखी महादेव मंदिर वसलेले आहे. गेल्या 250 वर्षापासून हे मंदिर येथे असल्याचे भाविक सांगतात. अत्यंत सुंदर रमणीय, अशा या परिसरामध्ये श्रावणात जत्रा भरते. तसेच दर सोमवारीही या परिसराला जत्रेचे स्वरूप येते.
मंदिरासमोरील भव्य पटांगणात भरलेली जत्रा आणि भव्यदिव्य असलेले प्रवेशद्वार भाविकांना आकर्षित करते. मंदिरात प्रवेश करताच समोर अन्य देवतांचे देखील मंदिर आहे. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर नंदी आणि शिवलिंग या दोघांच्यामध्ये होमकुंड आहे. भाविक आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी या होमकुंडात श्रीफळ अर्पण करतात. गाभाऱ्यात भव्य-दिव्य शिवलिंग पाहून मन प्रसन्न होते.
महिला भाविक शिव-नामाचा जप करत एकेक बिल्वपत्र शिवलिंगावर अर्पण करतात. त्याच वेळेस दुग्धाभिषेक चालू असतो. या सुंदर रमणीय परिसरात भाविकांकडून कसल्याही प्रकारची देणगी मागितली जात नाही. तसेच पावतीही फाडली जात नाही. जे काही द्यायचे ते दान पेटीत, अशी येथील परंपरा आहे.
पारंपारिक व्यवस्थापक म्हणून परंपरेने चालत आलेल्या चौधरी घराण्याचे प्रताप महाराज चौधरी हे सध्या मंदिराची व्यवस्था पाहत आहेत. सर्व भाविकांसाठी खुल्या असलेल्या या मंदिराच्या बाजूलाच भुयार देखील आहे. येथे 5 मुख असलेले पुरातन शिवपिंडी आहे. त्याच बाजूला विविध प्रकारच्या नागदेवता स्थापित झाल्या आहेत. आजही येथे नागदेवता येतात, असा दृढविश्वास येथे येणारे भाविक व्यक्त करतात.
मंदिर परिसरातच विठ्ठल रुक्मिणी, बजरंग बली, औदुंबर, गणपती, अशा अन्य देवतांचीही छोटी-छोटी मंदिरे आहेत. त्यामुळे पंचमुखीचे दर्शन घेताना या सर्वच देवतांचे भाविकांना दर्शन मिळते.