जालना - निसर्गाच्या प्रकोपामुळे वाढत चाललेली नापिकी. शेती करत असताना मेहनतीचे काम करावे लागत असल्यामुळे हल्लीची तरुण पिढी शेती करणे टाळतात. मात्र, तालुक्यातील नांदखेडा येथील रामेश्वर बोचरे हे जन्मत: दोन्ही पायांनी दव्यांग असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी शेतीतील सर्व कामे करून उपजिविका भागवत तरुणांसमोर आदर्श ठेवत आहेत. बदनापूर तालुक्यातील नांदखेडा हे छोटेसे गाव आहे. या गावात 40 वर्षीय रामेश्वर नामदेव बोचरे राहतात. दोन्ही पायांनी ते जन्मत:च दिव्यांग आहे. त्यांना नांदखेडा येथे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. पत्नी शांताबाई व मुलगी गंगासागर असा परिवार आहे.
दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही हिंमत न हरता बोचरे यांनी शेतीतील सर्व कामे शिकून घेतले. कपाशीत वखर मारणे, निंदणी, कापूस वेचणे, मका सोंगणी आदी कष्टाचे कामे ते लिलिया करतात. हातपायाने धडधाकट असलेल्यांपेक्षाही या कामात ते तरबेज झालेले आहेत. अडीच एकर शेती आणि कायम दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आपली शेती करून ते दुसऱ्यांच्या शेतीत रोजंदारीने मोलमजुरी करतात. शेतीतील कष्टाच्या कामाच्या जोरावर त्यांनी कबाडकष्ट करून मुलीचा विवाह करून दिला असून मुलगी गंगासागर ही मुरुमखेडा गावात सुखाने संसार करत आहे.
हेही वाचा - 'एमआयएम'सोबत नसली तरी मुस्लीम समाजाशी सामाजिक युती - अंजली आंबेडकर
याबाबत रामेश्वर बोचरे यांनी बोलताना सांगितले की, अंगात शक्ती आहे, सहनशिलता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत काम करून उपजिविका करतो, कायम दुष्काळ पडत असल्यामुळे रोजंदारीचे कामही मिळत नाहीत. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. दिव्यांगासाठी असलेल्या योजनेतून कायमस्वरूपी मदत माझे हातपाय थकल्यावर तरी मिळावी, अशी मागणी केली आहे. कष्टाच्या कामापासून तरुण पिढी दुरावत असल्याचे चित्र असतानाच रामेश्वर बोचरे यांच्या सारखे कष्टकरी तरुण पिढीला दिपस्तंभ ठरू शकतात.
हेही वाचा - काँग्रेसने जातीपातीचे राजकारण केले, आम्ही विकासाचे करत आहोत - रावसाहेब दानवे