जालना - सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कर्मचारी अधिकारी सतत गैरहजर असल्यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. वारंवार ये-जा करूनही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे कामे होत नसल्याने या कार्यालयाचा पंचनामा करण्याची मागणी जालना तहसीलदारांकडे केली.
सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही काम होत नाही, अधिकारी जागेवर भेटत नाहीत. या सर्व प्रकाराला जनता वैतागली आहे. तर, आवाज उठविल्यानंतर आपले काम होणार नाही या भीतीने अनेकजण पुढे येत नाहीत. मात्र, सोमवारी भगवान मोहनराव दाभाडे या सामाजिक कार्यकर्त्याने वैतागून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाचा पंचनामा करण्याची मागणी जालन्याचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्याकडे केली. त्यांनी लगेच जालना संबंधित कार्यालयातील तलाठी खालेद यांना सूचना देऊन या कार्यालयाचा पंचनामा करण्याचे सांगितले.
हेही वाचा - खेळताना चिमुकलीच्या हाती लागली विषारी पावडर, अन् झाले असे
तलाठी खालेद यांनी देखील तत्परता दाखवत हे कार्यालय गाठले आणि पंचनामा केला. या पंचनाम्यादरम्यान त्यांनी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील उपस्थितीपट तपासले. यावेळी आर.जी.लांडे, बी.एस. जडे, मोहम्मद अल्ताफ मोहम्मद शेख हे ३ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. या कार्यालयात एकूण ५ कर्मचारी आहेत. त्यातील त्यापैकी एक सरकारी कामगार अधिकारी आणि अन्य एक लिपीक कार्यालयात हजर होता. याच कार्यालयाच्या बाजूला कल्याणकारी मंडळाचे देखील कार्यालय आहे. त्यांचा हजेरीपट तपासला असता सय्यद मुजाहेद आणि प्रफुल गिरी हे दोन्ही कर्मचारी १० जानेवारीपासून गायब आहेत. संदिप उघडे हे देखील गायब आहेत. त्यांच्या रजेबाबत विचारणा केली असता रजा मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही कार्यालयातील एकूण १० कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचारी गैरहजर असल्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत. तर, सरकारी कामगार अधिकारी म्हणून येथे टि.ई. कराड हे कार्यरत आहेत.
हेही वाचा - सदर बाजार पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा गुटखा