जालना - जिल्ह्यात शनिवारपासून मद्यविक्रीला ऑनलाइन सुरुवात झाली आहे. मद्य विक्रीला सुरुवात होणार आहे हे सर्वांनाच माहीत झाले होते. मात्र, याची प्रक्रिया काय आहे हे माहीत नसल्यामुळे मद्यप्रेमींनी शहरातील सर्व दुकानांसमोर गर्दी केली होती.दारू थेट मिळणार नाही या निर्णयामुळे मद्यप्रेमींचा चांगलाच हिरमोड झाला. दुकानासमोर लावलेल्या फलकावरील नंबरचे फोटो घेण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे चित्र जालना शहरात पाहायला मिळाले.
जुना मोंढा भागातील अग्रवाल चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. खरेतर एका बाजूला मद्य विक्रीचे दुकान आणि दुसऱ्या बाजूला शहर वाहतूक शाखेची पोलीस चौकी त्याच्याच बाजूला उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय असे असतानाही येथे प्रचंड गर्दी झाली होती. विशेष बाब म्हणजे या मद्य विक्रीच्या दुकानासमोर पोलीस कर्मचारी हजर होते. अशीच परिस्थिती जवळपास अन्य दुकानांवर देखील होती तर काही अर्धवट शटर उघडून मद्य देण्याघेण्याचे व्यवहार सुरू होते. याबाबत चौकशी केली असता प्रत्यक्षात मात्र ही मद्य विक्री नाही ऑनलाइन नोंदणी आहे आणि त्यानंतरच दारू मिळेल असेही सांगितले जात आहे.
घरपोच मद्य विक्रीसाठी काही अतिरिक्त दर लावले आहेत का? याचाही तपास घेतला असता छापील किमती वरच चार-पाच तासांमध्ये हे मद्य घरपोच मिळणार आहे, अशी माहिती मिळाली. घरपोच दारू मिळणार असल्याने अनेक जणांची पंचायत झाली आहे. कारण ज्या नंबरवर मद्य नोंदवायचे आहे त्या नंबरवर मद्य पिण्याचा परवाना, घरचा पत्ता द्यावा लागणार आहे. त्यामुळे हे पार्सल आल्यानंतर घरी आपले बिंग फुटेल अशी भीतीही अनेक जणांना वाटत आहे.
दुकानासमोर फोटो घेताना आपण ओळखले जाऊ नये म्हणून तोंड झाकायला मद्यप्रेमी विसरले नाहीत. आज पहिल्याच दिवशी मद्य प्रेमी आणि दुकानदारांमध्ये या ऑनलाइन पद्धतीमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे. अन्य वेळी दुकानावर जाऊन देखील छापील किमतीपेक्षा चढ्या दराने हे दारू खरेदी करावी लागते. मात्र, घरपोच देतानाही छापील किमतीत घरपोच होईल, असे हे दुकानदार सांगत आहेत.
जोपर्यंत प्रत्यक्ष घरापर्यंत हे मद्य पोहोचत नाही तोपर्यंत तोपर्यंत खरी परिस्थिती समोर येणार नाही. मात्र, चढ्या दराने कोणी दारू विक्री करत असेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा आणि तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.