जालना - पीककर्जासाठी शेतकरी पहाटे चार वाजल्यापासून बँकेच्या दारात उभे होते. ही परिस्थिती 'ईटीव्ही भारत'ने गुरुवारी 12 जूनला बँक व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यामुळे बँक व्यवस्थापनाने या बातमीची दखल घेत ज्या शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर होणार आहे, अशा गावच्या शेतकऱ्यांनाच आज बँकेत बोलावून घेतले. त्यामुळे या शेतकऱ्यांची होणारी दैना थांबली आहे. शारीरिक अंतर पाळून कोरोनाचे नियमही पाळले जात आहेत.
सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे आणि बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. हा पैसा पीककर्जाच्या माध्यमातून शेतकरी उभा करत आहे. हे कर्ज घेण्यासाठी जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे असलेल्या युनियन बँकेच्या समोर पहाटे चार वाजल्यापासून शेतकरी रांगा लावून उभे होते. त्यातच टाळेबंदी असल्यामुळे पहाटेपासून रांगेत असलेल्या या शेतकऱ्यांना चहापाणीदेखील मिळत नव्हते. काम करून दुपारी घरी जाईपर्यंत उपाशी बसावे लागत होते. अशी दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची झाली होती. बँक व्यवस्थापन देखील शेतकऱ्यांच्या या अडचणीकडे दुर्लक्ष करत होते.
यासंदर्भात शुक्रवारी 12 जूनला 'ई टीव्ही भारत'ने शेतकऱ्यांची आणि व्यवस्थापनाशी संवाद साधत या अवस्थेला वाचा फोडली होती. याची दखल घेत आज बँक व्यवस्थापनाने एक गाव निवडत त्या गावातून पीककर्ज मागणी केलेल्या शेतकऱ्याला बोलावून घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त गर्दी करण्याचेही काम पडले नाही आणि रांगेत वेळही गेला नाही. तसेच कोरोनामुळे लागू असलेल्या सोशल डिस्टन्स नियमांचेही उल्लंघन झाले नाही. त्यासोबत आलेल्या शेतकऱ्यांना सॅनिटायझर मिळाल्यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भावही टळला आहे. शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था दूर झाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.