जालना - राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव (Omicron Cases) झपाट्याने वाढत असल्याने शासनाने लसीकरण (Vaccination) मोहिमेला गती दिलेली आहे. मात्र, या लसीकरण मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या जिल्ह्यातील तीन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह 14 वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आरोग्य विभागातील बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे. यासर्व प्रकरणाचा नागरिकांना मनस्ताप होत आहे.
- काय आहे प्रकरण?
ओमायक्रॉनने राज्यात वेगाने शिरकाव केला आहे. त्यातच जिल्ह्यातही या विषाणूचा रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारीच याबाबत आरोग्य विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. ग्रामीण भागातील लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी आणि काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई करत कमालीचा हलगर्जीपणा केला असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अंबड, मंठा, घनसावंगी येथील तालुका आरोग्य अधिकारी तसेच गोंदी, शहागड, सुखापुरी, वाकुळणी, सोमठाणा, राजूर, राजा टाकळी, डोंणगाव खासगाव, वरुड, रामनगर, तळणी, ढोकसाळ, पाटोदा या 14 आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, तीन दिवसात लेखी स्वरूपात खुलासा सादर करण्याचे आदेश या नोटीशीत देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.