जालना - वाढत्या कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरामध्ये मास्क न वापरणाऱ्यांना दंड करण्यासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे. मात्र, हे पथक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे प्रशासनाचा हा देखावा कशासाठी? आणि खर्चही कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शनिवारी हे पथक दिवसभर गांधीचमन परिसरात होते. मात्र या पथकाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना पाहण्याशिवाय काहीच केले नाही. नऊ लोकांच्या या पथकाच्या हातावर तुरी देऊन वाहनधारक पसार होताना दिसले. एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करीत आहे आणि याची भीती नागरिकांना बसावी त्यामुळे दंडही करत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक पथकही तयार केले आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेमधील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
या पथकामध्ये दोन पोलीस मित्र म्हणजे दोन शिक्षक, तीन तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले कर्मचारी आणि चार होमगार्ड असे 9 कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात मात्र या तिन्ही विभागाचे कर्मचारी आपली जबाबदारी एक-दुसर्यावर ढकलतात. ते त्यांचे काम आहे, असे म्हणत अंग झटकत आहेत आणि यामधून नागरिक त्यांच्या हातावर तुरी देऊन पसार होत आहेत. या नऊ कर्मचाऱ्यांवर रोज सुमारे १० ते १५ हजार रुपये खर्च प्रशासन करीत आहे. मात्र, या खर्चाचे या कर्मचाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही आणि प्रशासनालाही या कर्मचाऱ्यांनी किती काम केले हे विचारण्याची आवश्यकता वाटत नाही. जालन्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होणार कसा? या प्रश्नाचे उत्तर वेगळे देण्याची गरज नाही.