जालना - भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील शिक्षक देविदास एकनाथ नवेरकर (वय 34 वर्षे) यांचे शनिवारी (दि. 1 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कै. शेवंताबाई विद्यालय या विनाअनुदानित शाळेवर कार्यरत होते.
छातीत दुखत असल्याने ते सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात तीव्र झटका आला व डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मागील 10 वर्षांपासून ते विनाअनुदानित शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, 2 मुले असून महिनाभरापूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते.
हेही वाचा - बदनापूर नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना लाच प्रकरणी अटक
गेल्या दशकापासून विनाअनुदानित शिक्षक अडचणीत असून देविदास नवेरकर देखील या कारणांमुळे सदैव तणावाखाली होते. शासनाच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्रात आजवर अनेक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकीकडे 20 टक्के अनुदानावर प्रपंच व त्यात अस्मानी संकटे त्यामुळे शिक्षकांना तणावग्रस्त असून या शिक्षकांना निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही पुरेसा पगार नाही. विचित्र अवस्थेत शिक्षकांना अक्षरश: वेठबिगारी करावी लागत आहे. नुकतेच मुंबई येथे विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांच्या बेमुदत धरणे आंदोलनात ते सहभागी होते. शुक्रवारी ते घरी परतले होते व त्यानंतर ही दुःखद घटना घडली, असे इतर आंदोलनकर्त्या शिक्षकांनी सांगितले आहे. शासनाने विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांचा प्रश्न तातडीने सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या शिक्षकांतून होत आहे.
हेही वाचा - ...अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा वीज वितरण कंपनीला इशारा