जालना - जिल्हा पोलीस प्रशासनामध्ये वाहतूक शाखा या नावाने नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. वाहतूक सुधारणा तसेच रहदारीचे नियंत्रण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून अपघातांना आळा घालण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेसमोर आहे. जिल्ह्यातील बाजारपेठांच्या ठिकाणी वाढणारी गर्दी आणि वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये वाहतूक शाखेने तब्बल दीड लाखांचा दंड वसूल केला आहे. जुन्या जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्याच्या आवारातच हे नवीन कार्यालय सुरू झाले आहे.
स्वतंत्र कार्यभार
महामार्ग पोलीस, शहर वाहतूक पोलिसांच्या स्वतंत्र कार्यभारानंतर आता जिल्हा वाहतूक शाखा देखील स्वतंत्र असणार आहे. नव्यानेच पोलीस अधीक्षकपदाचा पदभार घेतलेल्या विनायक देशमुख यांनी जिल्ह्यातील वाढत्या अपघातांचा आणि विस्कळीत वाहतुकीचा आढावा घेतला. त्यानंतर या नवीन शाखेची निर्मिती करण्यात आली आहे. जालना शहरात असलेल्या शहर वाहतूक शाखेवर फक्त जालना नगरपालिकेच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याची जबाबदारी आहे.
तर या नव्या जिल्हा वाहतूक शाखेवर जिल्ह्यातील इतर बाजारपेठांच्या ठिकाणी आणि आठवडी बाजाराच्या ठिकाणी वाहनांवर नियंत्रण ठेवणे, अवैध प्रवासी वाहतूक यासह वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान आहे. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 12 पोलीस कर्मचारी यामध्ये सामील करण्यात आले आहेत. त्यांच्यावर पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांचे नियंत्रण असणार आहे.
दहा दिवसात दीड लाखांचा दंड वसूल
12 नोव्हेंबरला पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते जिल्हा वाहतूक शाखेचे उद्घाटन झाले. त्यानंतर आत्तापर्यंत 674 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार 100 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.