जालना - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'फिट इंडिया मुव्हमेंट', 'युवा जागरूक हो' या मोहिमेची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने आज जे.ई.एस. महाविद्यालयात विविध उपक्रम हाती घेण्यात आले. यावेळी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या महाविद्यालयाच्या वतीने आज सकाळीच महाविद्यालयापासून महाराणी झाशीची राणी पुतळ्यापर्यंत विद्यार्थ्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली. महाविद्यालयामध्ये क्रीडा विभाग प्रमुख डॉ. हेमंत वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये वॉकिंगचे फायदे सांगण्यात आले. दिवसभरामध्ये १० हजार पावले चालावीत याविषयी माहिती देण्यात आली.
या दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी आठ दिवसाचे बॉक्सिंगचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे. दुपारी तीन ते साडेचार या वेळेच्या दरम्यान हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचसोबत क्रिडा विभागात विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या आईला बोलावून त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी अमृतवाड, कॅप्टन एस.एम.मोहिते, प्राध्यापक सुनील चोरडिया, डॉ. किशोर बिरकायलू आदी मान्यवर प्राध्यापक व सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी या विविध उपक्रमात सहभाग नोंदविला.