जालना- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत बँकांनी कोणतीही अडवणूक न करता मराठा समाजातील युवकांना व्यापार उभारणीसाठी अर्थसहाय्य करावे. तसेच ज्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, त्यांनीही नियमित परतफेड करावी, जेणेकरून ही योजना सर्वव्यापक रूप धारण करून सर्व समाजाला तिचा फायदा होईल, असे मत मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बदनापूर येथील आढावा बैठकीत व्यक्त केले.
मराठा समाजातील तरुणांना व्यापार क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना अर्थसहाय्य मिळावे, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आढावा बैठका घेत आहेत. त्या निमित्ताने बदनापूर पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीला बँक व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थिती मोठ्या संख्येने मराठा समाजातील तरुणांची उपस्थिती होती.
यावेळी नरेंद्र पाटील यांनी बँकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्याही मॉर्गेजची गरज नसल्याचे सांगून राष्ट्रीयकृत बँकांनीही तरुणांना प्रवाहात आणण्यासाठी त्वरित अर्थसहाय्य करावे. कोणत्याही प्रकारे या नव व्यापाऱ्यांची अडवणूक न करता महामंडळाचा उद्देश सफल करावा, असे पाटील यांनी आवाहन केले. तसेच ज्यांना या महामंडळांतर्गत अर्थसहाय्य मिळाले त्यांनीही बँकेची परतफेड नियमित करावी. जेणेकरून बँकाही ताबडतोब अर्थपुरवठा करू शकतील. ज्यामुळे महामंडळाच्या कामात वेग येऊन मराठा समाजातील तरुणांना व्यापार वाढण्यास मदत होणार असल्याचे पाटील यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी बैठकीला आ. नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार, पंचायत समितीचे उपसभापती रवी बोचरे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत ईल्लकर, सहनिबंधक भरती ठाकूर, बँक ऑफ महाराष्ट्र बदनापूरचे शाखा व्यवस्थापक चेतन वानखेडे पंकज जऱ्हाड, शुभम टेकाळे, सुभाष चव्हाण आदींसह मोठया संख्येने मराठा समाजातील तरुणांची उपस्थिती होती.
हेही वाचा- ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशारच.. त्यांच्यात गुणवत्ता ठासून भरलेली