जालना - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात प्रचंड गाळ साठला असून या गाळासोबतच धरणाच्या काठावर मोठ-मोठी झाडे वाढल्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणाचे पाणी नगरपालिका घेत आहे, मात्र धरणाचे नगरपालिकेकडे अद्यापही हस्तांतरण न झाल्यामुळे नगरपालिक या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत आहे.
हे धरण 1935 मध्ये निजामाने बांधले होते. निजाम गेल्यानंतर मालमत्ता शासनाने संबंधित यंत्रणेच्या स्वाधीन करून हस्तांतरित केल्या आहेत. मात्र घाणेवाडी जलाशय अद्यापपर्यंत नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाही.
घाणेवाडी धरण कोणाच्या मालकीचे?
पर्यायाने घाणेवाडी धरणाची मालमत्ता ही राज्य शासनाच्या ताब्यात आहे. मात्र धरणाचा 100% उपभोग ही जालना नगरपालिका घेत आहे. त्यामुळे या धरणाची देखभाल दुरुस्तीदेखील जालना पालिकेने करायला हवी. गेल्या पाच-सहा वर्षांपासून घाणेवाडी जलसंरक्षण मंच हे गाळ उपसण्याचे काम करीत आहे. परंतु वर्षानुवर्षे वाढत जाणारा हा गाळ एका संस्थेला काढणे शक्य होत नाही आणि पालिका प्रशासन या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे धरणामध्ये सध्या चार फूट गाळ साचलेला आहे .
धरणातील गाळ काढला तर जालना शहराला दोन महिने पाणीपुरवठा होऊ शकेल एवढा पाणीसाठा या धरणात होईल, अशी शक्यता सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरराष्ट्रीय उद्योगपती सुनील रायठठ्ठा यांनी व्यक्त केली आहे.
तुकाराम मुंढे यांनी घेतले होते काम हाती, पण...
दहा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी हे धरण शासनाच्या ताब्यातील असल्यामुळे पूर्ण जागा मोजण्याचे काम हाती घेतले होते. मात्र त्यांची बदली झाल्यामुळे ते काम अर्धवटच राहिले होते.
...नाही तर धरणाला धोका
झाडे पाण्याच्या पातळीपासून वर असतात. त्यामुळे जोपर्यंत झाडे जिवंत आहेत तोपर्यंत धरणाला धोका होत नाही. मात्र झाडे मृत झाल्यानंतर त्यांच्या मुळाची झिज होऊन धरणात पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशी झाडे काढून घ्यायला हवीत. अन्याथा अशा वाढणाऱ्या मोठ्या झाडांमुळे कदाचित दुर्घटनेला ही सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.