जालना - मी तर अजून लहान आहे, स्वयंवराची घाई नाही, हे उत्तर आहे. लिटिल चॅम्प मुग्धा वैशंपायन हिचे जालना शहरामध्ये रुक्मिणी परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत मैफिलीच्यानिमित्ताने ती बोलत होती.
लिटिल चॅम्पच्या माध्यमातून सर्वांना परिचित असलेली छोटी गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचा गायनाचा कार्यक्रम रुक्मिणी परिवाराच्यावतीने शुक्रवार दिनांक ५ एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. याच दिवशी मुग्धा वैशंपायनचा वाढदिवस होता. त्यामुळे सर्व रसिकजनांच्या साक्षीने आणि तिची आई वैशाली वैशंपायन यांच्या उपस्थितीत मुग्धाने एकोणिसाव्या वाढदिवसाचा केक कापला. रुक्मिणी परिवाराच्यावतीने आणि रुक्मिणी गार्डनमध्येच आयोजित या कार्यक्रमात प्रेक्षकांनीदेखील मुग्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हळूच एक प्रश्न विचारला रुक्मिणीस्वयंवर कधी होईल? या प्रश्नाचे तिनेही लाजत उत्तर दिले. अरे बापरे, मी तर अजून लहान आहे, फक्त एकोणवीस वर्षांची.
मुग्धाच्या वाढदिवसामुळे मर्मबंधातील ठेव या कार्यक्रमाची गाठ अधिकच पक्की झाली. जालन्यात ९ वर्षापुर्वी देखील असा कार्यक्रम झाला होता. मात्र, त्यावेळी माझा वाढदिवस नव्हता. परंतु, वाढदिवसाच्या दिवशी रसिकजनांमध्ये जाऊन जो आनंद मिळतो, तो आनंद मिळण्याची ही माझी दुसरी वेळ आहे, असेही ती म्हणाली.