जालना - मंगळवारी जालन्यातील कवायत मैदानावर परेड शिवाय वेगळेच चित्र पाहायला मिळाले. ते म्हणजे पोलिसांनीच पोलिसांसोबत केलेली ढिशूम-ढिशूम ! राज्याचे कायदा व सुव्यवस्था पाहणारे अप्पर पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे जालना जिल्हा पोलीस प्रशासनाचे तपासणी करणार आहेत. या तपासणी दरम्यान मंगळवारी त्यांनी परेड झाल्यानंतर पोलिसांची काय तयारी आहे याची तपासणी केली.
मॉक ड्रिलच्या दरम्यान पोलिसांनी घडवून आणलेल्या खोट्या चकमकी आणि आंदोलनकर्ते यांना पांगविण्याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आंदोलनकर्ते दगडफेक करतात, जाळपोळ करतात मात्र त्यांच्या या सर्व प्रकारांना पोलीस प्रशासन कसे हाणून पाडते हे प्रत्यक्ष येथे पाहायला मिळाले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्यानंतरही पोलीस आंदोलकांना हे प्रकार थांबविण्याच्या सूचना देतात. तरीदेखील आंदोलन थांबत नसेल तर विविध टप्प्यांमध्ये ते थांबविण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये अश्रुधूर, लाठीचार्ज असे प्रकार आहेत.
मात्र त्यानंतरही जर जमाव ऐकत नसेल तर नाईलाजाने गोळीबारही करावा लागतो. या गोळीबारात जखमी झालेल्या आंदोलकांना जबाबदारीचे जाणीव ठेवून हेच पोलीस कर्मचारी रुग्णालयातही नेतात. हा सर्व प्रकार मंगळवारी पोलीस कवायत मैदानावर सकाळी पाहायला मिळाला. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक यांच्यासोबत पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या समक्ष ही पोलिसांची ढिशूम-ढिशूम पाहायला मिळाली.