अमरावती- दर्यापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या खल्लार गावात नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवारी रात्री राडा झाला. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार अरुण बुंदीले यांच्या प्रचारासाठी आयोजित भाजपाच्या नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या सभेत काही युवकांनी गोंधळ निर्माण केला. या युवकांनी सभेच्या ठिकाणावरील खुर्च्या मंचाच्या दिशेनं भिरकवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
असा घडला प्रकार- खल्लार गावात रात्री आठ वाजण्याच्या सुमाराला माजी खासदार नवनीत राणा या अरुण बुंदीले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आल्यानंतर काही युवकांनी उपद्रव करण्यास सुरुवात केली. सभा सुरू झाल्यावर उपस्थित 30 ते 40 युवकांनी राणांचे भाषण सुरू असताना मध्येच ओरडणे, काहीतरी बोलणे असा प्रकार सुरू केला. नवनीत राणा यांनी भाषणाला सुरुवात केली असताना काही युवकांकडून विचित्र अशा कमेंट्स पास केल्या जात होत्या. काही वेळातच या युवकांनी खुर्चीवरून उठून आपल्या जवळची खुर्ची चक्क मंचाच्या दिशेनं भिरकवण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे सभास्थळी गोंधळ उडाला.
नवनीत राणांचा पोलीस ठाण्यात ठिय्या- युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार अरुण बुंदिले यांच्या प्रचार सभेत काही युवकांनी धुडगूस घातल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी खुर्ची लागल्यामुळे एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या संपूर्ण प्रकरणामुळे गावात तणाव निर्माण झाला. नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाणे गाठून झाल्या प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी काही मंडळींनी या सर्व प्रकरणामागे तीन जण आहेत, असे सांगितलं. त्या तिघांना अटक होईपर्यंत पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडणार, अशी भूमिका घेतली. रात्री दीड वाजता माजी खासदार नवनीत राणा या अनेक कार्यकर्त्यांसह खल्लार पोलीस ठाण्यात पोहोचल्या. यावेळी खल्लार पोलीस ठाण्यात आणि पोलीस ठाण्यासमोर शेकडो कार्यकर्ते जमा झाले.
हा नियोजित कट- " खल्लार येथील प्रचार सभेत घडलेला प्रकार निंदनीय आहे. विशिष्ट समुदायातील युवकांनी माझ्यावर हल्ला केल्याचा हा प्रयत्न निंदनीय आहे. अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणारी नाही. माझा प्रचार मी सुरूच ठेवणार आहे, "अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली. पुढे राणा म्हणाल्या, " आमची शांततेनं प्रचारसभा सुरू होती. युवकांकडून घाणेरडे इशारे सुरू होते. ताईंना काही बोलू नका, थोड्याच वेळात जाणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितलं. मला मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी खुर्च्या फेकल्यानं सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. सहा अंगरक्षक, तीन-चार पीए यांनी माझ्या सुरक्षेसाठी कडे केले. त्यांच्यावर ते युवक थुंकले. त्यांना अटक करण्यात यावी."
हेही वाचा-