बदनापूर (जालना) - बदनापूर शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार ९ एप्रिलला बंद ठवण्यात आलेला असल्यामुळे मार्केट कमिटी यार्डात केवळ भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने लावावित अन्य दुकाने लावता येणार नाहीत. विक्रेत्यांनी दुकाने लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नगर पंचायत, पोलीस,व महसुल प्रश्नाने व्यापाऱ्यांच्या बैठकीत दिला. यावेळी व्यापाऱ्यांना आपापले व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा व्यापाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसे जालना जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांनी दिला.
बाजार बंदसाठी बैठक -
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अत्यावश्यक सेवा वगळून इतर व्यवसायांना बंदी घेतली असून गर्दी करणे, विनामास्क बाहेर फिरणे यासाठी दंडात्मक कारवाईचे आदेश निर्गमित केला आहे. शुक्रवारी रात्री पासून ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. जालना जिल्हा अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील आठवडी बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठवण्याचे आदश दिले होते. हे आदेश पुन्हा ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आल्याने बदनापूर नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, तहसीलदार छाया पवार यांनी ८ एप्रिलला बदनापूरनगर पंचायत सभागृहात भाजीपाला विक्रेते व व्यापाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत ९ एप्रिलला शुक्रवारचा आठवडी बाजार मार्केट कमिटी यार्डात भरणार नाही, केवळ त्या ठिकाणी भाजीपाल्याची दुकाने लावता येतील असे जाहीर करून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी दिला.