जालना Maratha Protest : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं संपूर्ण जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीये. मंगळवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळीच इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती, त्यामुळं आदोलकांनी संताप व्यक्त केला आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
जालन्यात विविध ठिकाणी आंदोलनं : सोमवारपासून जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू आहेत. रोडवर टायर पेटवून आंदोलक रस्ते अडवत आहेत. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर परिस्थिती आणखी चिघळू, नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दोन दिवस इंटरनेट बंद : बीड जिल्ह्यात इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जालना जिल्ह्यातही दोन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. गुप्तचर यंत्रणांकडून जिल्हाधिकाऱ्यांना काही अनुचित घटनांची माहिती मिळाल्याचं सुत्रांनी सांगितलंय. त्यामुळं परिस्थिती पाहता इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.
प्रशासनाविरोधात घोषणाबाजी : जालन्यातील इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर मराठा आंदोलक पुन्हा आक्रमक झाले. जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळं या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
आमदारांच्या घरांना आग : बीडमध्ये मराठा आंदोलकांनी आमदारांच्या घरांना आग लावली होती. तसंच काही खासगी मलमत्तांच नुकसान केलं होतं. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. कुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, कुणाची संपत्ती जाळण्याचा प्रयत्न झाला, तर पोलीस बघ्याची भूमिका घेणार नाहीत. त्यामुळं या सर्वांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसंच जेथं शांततेत आंदोलन सुरू आहे, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. प्रत्येकाला शांततेनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -