जालना - मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा अद्यापही न्यायालयाच्या पटलावर आहे. परंतू, तो सक्षमपणे लढवला जात नाही, असे मत मराठा समाजाचे आहे. त्यामुळे अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे बुधवारी (20जानेवारी) ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
पन्नास गावांचा आहे पाठिंबा -
शहागड-पैठण या रस्त्यावर शहागडपासून 10 किलोमीटर अंतरावर हे साष्ट पिंपळगाव गाव आहे. सोळा हजार लोकवस्तीच्या गावात 60 टक्के मराठा समाज तर 40 टक्के इतर समाज आहे. 20 तारखेला हे सर्वच गाव ठिय्या आंदोलन करणार आहे. या गावच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील पन्नास गावातील ग्रामस्थदेखील उपस्थित राहणार आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.
तरुणी व महिलांचाही पुढाकार -
याआंदोलनाला फक्त पुरुषांनीच नाही तर गावातील महिला आणि तरुणींनी देखील पुढाकार घेतला आहे. फक्त आरक्षण नको तर ते टिकणारे आरक्षण पाहिजे, अशी आग्रही मागणी या गावकऱ्यांची आहे. मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही लढा देणार असल्याचे महिलांनी सांगितले.
सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न -
ग्रामीण भागामध्ये आंदोलनकरून राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या आंदोलनातून केले जात आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. राज्य शासनाने मराठा समाजाची बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडावी आणि आरक्षण मिळवून द्यावे, या हेतून साष्ट पिंपळगावमध्ये आंदोलन केले जाणार आहे.
नेते आणि कार्यकर्त्यांची सम-समान व्यवस्था -
ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता येण्याची शक्यता आहे. हे ग्राह्य धरून साष्ट पिंपळगाव येथेच भव्य मंडप टाकण्यात आला आहे. जे कोणी आंदोलनाला पाठींबा द्यायला देण्यासाठी येणार आहेत त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही व्यवस्थापन समितीने सांगितले. कोणत्याही लोकप्रतिनिधीला विशेष सुविधा उपलब्ध करून दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.