मनोज जरांगे पाटील यांची उपोषण नियोजन बैठक जोरात; मुंबईला जाण्यासंदर्भात दिल्या समाजबांधवांना सूचना - मराठा समाज
Manoj Jarange Patil : २० जानेवारीला मुंबईकडे कूच करण्यासाठीची जरांगे पाटलांनी तयारी जोरदार सुरू केली आहे. नियोजन कसं करायचं याबाबत जरांगेंनी मुंबईकर मराठ्यांना काही सूचना केल्या आहेत. उपोषण आझाद मैदानावर आणि स्वयंपाकासाठी शिवाजी पार्क, ह्यासह अनेक महत्वाच्या बाबींवर जरांगे पाटलांनी काही सूचना केल्या आहेत.


Published : Jan 3, 2024, 10:26 PM IST
जालना Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे एक महत्त्वाची बैठक घेतली. तसंच यावेळी त्यांनी सरकारच्या शिष्टमंडळासोबत सुद्धा चर्चा केली आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना काही सूचना दिल्या आहेत. अंतरवाली सराटीतून लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने समाज बांधव रवाना होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना मूलभूत साहित्य सोबत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्वच्छालय आणि स्वयंपाकाची व्यवस्था करावी : पुढे बोलताना म्हणून जरांगे पाटील म्हणाले की, आता आमच्या माता माऊली इकडची खिंड लढवणार आणि आम्ही तिकडे येऊन तिकडची खिंड लढवणार. तसेच लाखोच्या संख्येने मुंबई येथे मराठा समाज बांधव हा आंदोलनासाठी 20 जानेवारीपासून दाखल होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आम्हाला मदत करायला पाहिजे. समाज बांधवांसाठी महापालिकेने स्वच्छतालय आणि स्वयंपाकाची व्यवस्था शिवाजी पार्क या परिसरामध्ये करून द्यायला पाहिजे. तसंच यामध्ये काही महिला स्वयंसेवक यांचीही सुद्धा गरज भासणार असल्याचं मत त्यांनी समाज बांधवांच्या बैठकीत बोलून दाखवलं. त्याचबरोबर वकिलांची सुद्धा मोठी टीम लागणार असल्याचं ते म्हणाले.
मुंबईकडून एक मार्ग मोकळा ठेवावा : आंदोलनामध्ये राज्यातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. त्यामुळं महिलांची व्यवस्था सुद्धा करावी लागणार आहे. जरांगे पाटील यांनी शासनाला इशारा दिला आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. यामुळं अन्नधान्याचा साठा सुद्धा समाज बांधवांनी सोबत ठेवावा. शासन दंडेलशाही करत इंटरनेट सुविधा बंद करू शकते असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईकडून येणारा एक मार्ग मोकळा ठेवावा लागेल. आम्ही दीड महिने पुरेल इतका अन्न धान्याचा साठा सोबत ठेवला आहे. तर डॉक्टरांची सुद्धा मोठी टीम या आंदोलना दरम्यान तैनात राहणार असल्याची माहिती, जरांगे पाटील यांनी दिलीय.
हेही वाचा -