जालना - कर्ज वसुली करुन परतताना अज्ञात चोरट्यांनी लुटमार केली. यात ४ लाख २८ हजार रुपये पळवले, अशी तक्रार फायनान्स कंपनीचा मॅनेजर सतीश घोडे याने पोलिसात दिली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, यात मॅनेजरनेच ते पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. पैसे हडपण्यासाठी मॅनेजरने स्वतःच लुटमार झाल्याचा बनाव केल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले.
महिंद्रा हाऊसिंग फायनान्सच्या राजुर शाखेचा मॅनेजर सतीश घोडे हा २५ मार्चला कोठा दाभाडी येथे वसुलीसाठी गेला होता. त्याच्याजवळ वसुलीचे ४ लाख २८ हजार रुपये एका बॅगमध्ये होते. दोन अज्ञात लोकांनी त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हातातील बॅग पळवली, अशी तक्रार घोडे याने पोलिसांत दिली. त्यानुसार भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एम. मेहेत्रे करत होते.
या प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर घोडे काहीतरी लपवत असल्याची शंका पोलिसांना आली. पोलिसांनी कर्ज वसुली संदर्भातली माहिती फायनान्स कंपनीकडून घेतली. तेव्हा पोलिसांना आढळून आले, की या कालावधीमध्ये कर्जदारांच्या प्रत्यक्ष भेटी घोडेने घेतल्याच नव्हत्या. कर्जदारांकडून ही रक्कम घेतली गेली नव्हती. तरीही शुक्रवारपासून विविध कर्जदारांच्या नावाने पावत्या फाडून ती रक्कम जमा केल्याचे कंपनीला सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात फक्त एका कर्जदाराकडून ३९ हजार रुपये घोडेने घेतले होते.
पण, ही रक्कम बँकेत भरली नव्हती.त्यामुळे कंपनीच्या वरिष्ठांकडून या रकमेची विचारणा होत होती. सुट्टी असल्याने रक्कम भरली नाही असे घोडेने सांगितले. ती चुकविण्यासाठी त्याने चोरीचा बनाव केला. ज्या दुकानातून मिरचीची पूड घेतली त्या दुकानदाराने त्याला ओळखले आहे. सतीश घोडे याने स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. स्वतः जवळ असलेली ३९ हजारांची रक्कम त्याने पोलिसांना सुपूर्द केली. त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.