जालना - मांडव परतण्यासाठी माहेरी परत आलेल्या नवविवाहितेचा चाकू भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी मंठा येथे घडली. मंगळवारी पाच वाजेच्या सुमारास भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वैष्णवी नारायण गोरे (वय 20) हिचे जालना येथील एका तरुणाशी पाच दिवसांपूर्वी लग्न झाले होते. रितीरिवाजाप्रमाणे मांडव परतीसाठी ती परत मंठा येथे आली होती. दरम्यान, काही सामान खरेदीच्या निमित्ताने तिची मैत्रीण, ती आणि तिची आई या तिघी मिळून बाजारात जात असताना पाठीमागून येऊन एका युवकाने वैष्णवीच्या मानेवर आणि हातावर चाकूचे वार केले. त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळली.
दरम्यान, चाकू हल्ला करणारा आरोपी पसार झाला आहे. या संदर्भात मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मंठा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी मंठा पोलिसांनी वैष्णवी गोरेवर हल्ला करणारा संशयित म्हणून शेख अल्ताफ शेख बाबू याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला असल्याची चर्चा मंठा शहरात सुरू आहे. कारण या तरुणाने देखील विषारी औषध पिले असल्यामुळे त्याच्यावर जालना येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. आहे. लॉकडाऊनच्या काळात मंठा शहरामध्ये आणि तेही भर बाजारपेठेत ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.