जालना : भोकरदन तालुक्यातील विरेगावात एका 32 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला आहे. ही घटना सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. 32 वर्षीय राजू आत्माराम दळवी असं मृत तरुणाचं नाव आहे. तो एका फायनान्स कंपनीत कामाला होता.
रविवारी 11 एप्रिलला रात्री तो बाहेरून जाऊन येतो. असे म्हणून घरच्यांना सांगून घराबाहेर पडला. मात्र, उशिरापर्यंत तो घरी परतलाच नाही. त्यामुळे घरच्यांनी व नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी सोमवारी जुई धरण पाटीजवळील चोऱ्हाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत राजू याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर मृतदेह विहीरीबाहेर काढून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी भोकरदन पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहे.
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात राजू दळवी याचे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, चार बहिणी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा : VIDEO : पंचगंगेच्या तीरावर लावली म्हशींची शर्यत; पोलीस येताच ठोकली धूम