जालना - श्री भोलेश्वर संस्थान बरडी येथे महाशिवरात्रीनिमित्त 108 यज्ञ कुंडामध्ये होम हवन करून महाशिवरात्र साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. शहरापासून अलिप्त मोकळ्या जागेत मंदीराचे भव्यदिव्य बांधकाम काम करण्यात आले आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून हे संस्थान नावारूपाला येत आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात शहर व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गाभाऱ्यामध्ये भोलेश्वरची मूर्ती आहे. तसेच मूर्ती खालीच भुयार असून त्यामध्ये शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे भक्तांना दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यातून खाली भुयारात जावे लागते. शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
शिवस्वरूप सच्चिदानंद स्वामी महाराज हे संस्थांनाचा कारभार सांभाळत आहेत. संस्थानच्या वतीने विठ्ठलराव गाडेकर, हिरामण कुरे, दिलीप बांडे, राधाकिसन घाडगे, प्रभाकर देशमुख, आदी भक्त व्यवस्था पाहात आहेत. तसेच महाशिवरात्रीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.