जालना - ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यात विक्रीसाठी अवैध मार्गाने जात असलेला देशी दारूचा साठा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला आहे. पोलिसांनी एकूण ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - 'टॉमी' म्हणणाऱ्यांना योग्य वेळ आल्यावर उत्तर देऊ - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहेत, आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सर्वत्र नजर आहे. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत देशी दारू परजिल्ह्यात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली होती. तसेच, लक्कडकोट परिसरातील एका देशी दारूच्या दुकानातून सीलबंद देशी दारूचे बॉक्स एका कारमध्ये टाकून काही जण जात असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास लक्कडकोट भागात एका चॉकलेटी रंगाच्या इंडिगो कार (क्र. एम.एच 28 व्ही 2848) मधून दारूसाठा जप्त केला.
57 हजार रुपयाची देशी दारू जप्त
पोलिसांनी कारमधून देशी दारूचे सीलबंद 15 बॉक्स जप्त केले. यात एकूण 720 बाटली होत्या, आणि याची किंमत 57 हजार 600 रुपये आहे. बॉक्स वाहून नेणाऱ्या कारची किंमत 3 लाख 50 हजार रुपये असून, दारूसह एकूण 4 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी देशी दारू दुकानाचे चालक-मालक सतीश उर्फ प्रकाश लाला जयस्वाल, रामेश्वर दत्ता पवार, अनिकेत रामेश्वर जाधव यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, कृष्णा तगे, प्रशांत लोखंडे यांचा समावेश होता.
हेही वाचा - जालना : ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान यंत्रे सीलबंद