बदनापूर (जालना) - शेतात काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी घडली आहे. जालना जिल्ह्यातल्या वंजारवाडी शिवारात ही घटना घडली. या हल्ल्यात ही महिला जखमी झाली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कौसल्याबाई फकिरबा चौधरी असे या महिलेचे नाव आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, नागरिकांनी बिबट्याला पकडण्याची वनविभागाकडे मागणी केली आहे.वंजारवाडी शिवारातील गट क्रमांक 212 मध्ये कैसल्याबाई आपल्या शेतात काम करत होत्या. यावेळी मागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याबाबत वनपाल सुनील हिवरेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही वनरक्षक पाटील यांच्यासह घटनास्थळाला भेट दिली असून, लोकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. आमच्या विभागाकडून हल्लेखोर प्राण्याच्या पायाचे ठसे शोधण्यात येत असून, त्यावरून नेमका कुठला प्राणी आहे, याची खातरजमा करण्यात येईल.