जालना - भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दुसऱ्या पक्षात गेले आहेत, ही खडसेंसाठी दुर्दैवाची बाब आहे. त्यांनी संयम ठेवायला हवा होता. ते दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे जळगाव किंवा मुक्ताईनगर मतदार संघात कसलाही फटका भाजपला बसणार नाही याची खात्री आम्हाला आहे. अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दिली आहे.
पूढे बोलताना खासदार दानवे म्हणाले की, एकनाथ खडसे हे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आहेत, ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ही दुर्दैवी गोष्ट आहे.खडसेंवर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या सर्व आरोपांची शहानिशा न्यायालयात सुरू आहे. मात्र त्यांच्यावर असलेले आरोप हे सत्य असतील असे नाही, परंतु जोपर्यंत न्यायालय त्यांना निर्दोष मानत नाही तोपर्यंत त्यांना निर्दोष म्हणता येणार नाही.
जळगावमध्ये खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही. अशाप्रकारच्या पोकळ्या या नेहमीच तयार होत असतात आणि त्या भरून देखील निघतात. खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा ठपका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवला आहे. मात्र हा आरोप तथ्थहीन असल्याचेही ते यावेळी म्हणालेत.