जालना - आज जागतिक सायकल दिन, हा दिवस जरी आज साजरा करण्यात येत असला तरी आपल्याकडे सायकलचे महत्त्व फारसे गणल्या जात नाही. पूर्वी गरिबाचे प्रवासाचे साधन म्हणून सायकलकडे पाहिले जायचे, मात्र आता ती परिस्थिती बदलली आहे. गरीब-श्रीमंत हा भेदभाव न राहता आता सायकल हा एक पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि शरीराच्या सुदृढतेसाठी पर्याय होत चालला आहे. म्हणूनच जेईएस महाविद्यालयातील 16 प्राध्यापकांनी सायकल खरेदी केली आहे आणि त्याचा वापर ही दर शनिवारी केला जात आहे.
जेईएस महाविद्यालयातील क्रीडा विभाग प्रमुख हेमंत वर्मा यांनी या सायकलच्या वापरासाठी पुढाकार घेतला आहे. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणि सामान्यांसाठी अशा दोन गटात सायकल स्पर्धा घेतल्या होत्या, परंतु वाढता चंगळवाद पाहता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून प्रतिसादच मिळालेला नाही. कारण बहुतांशी विद्यार्थ्यांकडे मोटारसायकल तर मुलींकडे स्कुटी प्रकारातील वाहने आहेत. परंतु सामान्य माणसांकडून सायकल स्पर्धेसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सायकल सप्ताहाचे आयोजन
सायकल दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 जून ते 12 जून दरम्यान सायकल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये कोणीही कुठूनही भाग घेऊ शकतो. त्यासाठी प्ले स्टोअरवर असलेले strava हे ॲप डाऊनलोड करून जीपीआरएस तंत्रज्ञानाच्या साह्याने आपण सायकलचा किती किलोमीटर वापर केला याची माहिती मिळते आणि ती ऑनलाइन पद्धतीने या क्रीडा विभागात पाठविल्यानंतर विजेत्याला ई प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देखील मिळणार आहे.
सायकलचे फायदे
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकलचा फायदा होतो. कुठेही केव्हाही उभी करता येते. अपघाताची शक्यता कमी. पायाच्या स्नायूंसाठी अत्यंत उपयुक्त. इंधनाची बचत करून खर्चही वाचतो. देखभाल दुरुस्तीचा खर्च नाही. सुरुवातीला महाविद्यालयात सायकलवर फिरणारे हेमंत वर्मा यांच्यापासून प्रेरणा घेत घेत प्राचार्यांनी देखील सायकल घेतली आणि आता महाविद्यालयातील 16 प्राध्यापकांनी सायकल घेतली आहे. दर शनिवारी या सायकलचा वापरही केला जात आहे.
हेही वाचा-ओबीसी आरक्षणासाठी पुण्यात भाजपचे 'आक्रोश आंदोलन'