जालना - पाणी टंचाईच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि नैसर्गिक जलस्त्रोत वाढवण्यासाठी जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या पुढाकारातून जल पुनर्भरणाचे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' स्पर्धेचे आयोजन देखील जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आहे. काही ठिकाणी वर्षातील सहा महिने टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासकीय कार्यालये आणि घरांवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' म्हणजेच जल पुनर्भरणाचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. पंचायत समिती स्तरावर कार्यशाळा घेऊन ही योजना राबविण्यासंदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली जात आहे.
संबंधित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 15 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चौदा गावांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.