जालना - पुढील आठवड्यात येत असलेले विविध सण आणि जयंती उत्सव लक्षात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकरांची उपस्थिती होती. १४ तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीदरम्यान दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा खिराडकर यांनी दिला आहे.
१३ तारखेला रामनवमी, १४ तारखेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती त्यानंतर १७ तारखेला महावीर जयंती, १९ तारखेला गुड फ्रायडे आणि हनुमान जयंती लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाच्या वतीने सदर बाजार पोलीस ठाण्यात शांतता समितीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समितीच्या सदस्यांनी विविध सूचना मांडल्या ज्यामध्ये या सण आणि उत्सवानिमित्त नगरपालिकेने जास्तीचे पाणी सोडावे, दारूची दुकाने बंद ठेवावीत, रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, पथदिवे सुरू करावेत, अशा विविध स्वरूपांच्या सूचना समितीच्या सदस्यांनी मांडल्या, दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिराडकर यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच समाजाचे कौतुक करतांना तेथील कार्यानुभव विशद केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मिरवणूक देखील धुमधडाक्यात काढावी मात्र संविधानाच्या चौकटीत राहून करावे तसेच रात्री बाराच्या आत शेवटची मिरवणूक संपवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
मिरवणुका या परवानग्या घेऊनच काढव्यात तसेच या मिरवणुकांदरम्यान दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही खिराडकर यांनी दिला. या बैठकीला परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक राहुल गायकवाड, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडेंसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश रत्नपारखे, शेख अत्तर भाई, कपिल खरात, दिपक डोके, विकास बागडी, मनोज भगत, शेख उमर आदींची उपस्थिती होती.