जालना - दुचाकीमध्ये अनधिकृत बदल करून नागरिकांची डोकेदुखी वाढविणाऱ्या दुचाकी चालकांवर आज दसऱ्याच्या दिवशी संक्रांत आली. शहर वाहतूक शाखेने आज अचानक मोहीम सुरू करून वाहनांवर बसवलेले अनधिकृत हॉर्न, लाईट, विविध प्रकारचे नंबर यांच्यावर कारवाई केली. जुने वाहन खरेदी करायचे आणि त्यामध्ये सर्वच बदल करायचा ही जणू क्रेझच झाली आहे. विशेष करून यामाहा कंपनीच्या जुन्या दुचाकींमध्ये हे अशाप्रकारचे मोठे फेरबदल करून सायलेन्सर बदलून रस्त्याने मोठ्या आवाज करत गाडी रेस करीत पळवणे ही एक त्यामधीलच क्रेझ. शहरात गल्लीबोळ्यांमध्ये अशा दुचाकींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचसोबत एकाच दुचाकीला चार हॉर्न लावणे, नियमापेक्षा अधिकचे लाईट बसवणे, असे प्रकार वाढले आहेत.
कंपनीने दिलेल्या लाईटांपेक्षा जास्त क्षमतेचे लाईट बसवल्यामुळे दुचाकीच्या समोरून येणाऱ्या वाहनांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यासोबत वाहनांच्या क्रमांकांमध्ये बदल करून त्यामध्ये डिझाईन दाखवणे, हा प्रकार तर जुनाच आहे. मात्र, आता यावरदेखील वाहतूक शाखेने लक्ष देणे सुरू केले आहे. त्यामुळे आज शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांच्या पथकांनी मामा चौकांमध्ये अशाप्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आणि त्यामध्ये अनेक दुचाकीस्वार अडकले.
विशेष म्हणजे प्रत्येक दुचाकीस्वार पोलिसांनी अडविल्यानंतर खिशातला मोबाईल काढत कोणालातरी फोन लावायचा आणि पोलिसांच्या हातात द्यायचा, अशाप्रकारचा दबाव आणण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होता. मात्र, या प्रकाराला पोलीस उपनिरीक्षक सुरेश भाले यांनी भीक घातली नाही आणि पावत्या फाडण्याचा सपाटा सुरूच ठेवला. त्यामुळे आज दसरा असतानाही दुचाकीमध्ये अवैध फेरबदल करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मात्र संक्रांत आली आहे.