जालना- गुरुवारी दुपारी जुन्या जालन्यात गस्त घालत असताना डबल जीन भागातून जात असताना कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना हातभट्टीच्या दारूचा वास आला. महाजन यांनी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या जवानांसह छापा टाकला. या कारवाईत एक ते दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी हातभट्टी दारू प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे, तर एक जण फरार झाला.
कदीम जालना पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी गल्ली बोळांमध्ये घराघरात आणि मोकळ्या पटांगणात आठ हाभट्ट्या पेटविलेल्या स्थिती होत्या. पोलिसांनी त्या उदध्वस्त केल्या. कारवाई दरम्यान पोलिसांना शौचालयात ठेवलेला सडवा सापडला तो देखील नष्ट करण्यात आला आहे.
पोलिसांना काही घरांमध्ये जमिनीखाली पुरून ठेवलेले दारूचे ड्रम आढळून आले. ड्रममधीलदारू हात पंपाच्या साह्याने उपसली जात होती. पोलिसांनी या ठिकाणाहून नवसागर, सडलेला गुळ, दारू तयार करण्यासाठी लागणारे ड्रम, लाकडे ,असा सुमारे एक ते दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे अनेक ड्रम नष्ट केले आहेत.
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. जमिनीमध्ये पुरून ठेवलेले ड्रम आज उखडून काढण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली.