जालना - चोरांना देखील चोरी करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो, आणि त्यामध्ये त्यांच्या आवडी निवडी देखील असतात हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या एका चोराकडून समोर आले आहे. या आरोपीला रात्रीपेक्षा दिवसा चोरी करायला सोपे जायचे आणि त्याला ते आवडायचे. परंतु स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पंधरा दिवस सहा हजार सातशे किलोमीटरचा प्रवास करून या चोराच्या मुसक्या आवळल्या.
असा सुरू झाला तपास
2 फेब्रुवारीला जालन्यातील गोपीकिशन नगर येथे राहणाऱ्या गोविंदप्रसाद पांडे यांच्या घरी दुपारी चार वाजता चोरी झाली. आणि चोरी होताना या आरोपीने वापरलेली लाल रंगाची शेरवोलेट कार क्रमांक एम एच 16-ए टी 39 41 सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. मात्र या कारचा क्रमांक सीसीटीव्ही मध्ये दिसत नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल केला. शेजारच्या जिल्ह्यामध्ये देखील पोलिसांना याविषयी माहिती दिली. त्यावरून बुलढाणा पोलिसांनी याच कारचा वापर करून बुलडाण्यात देखील चोरी झाल्याची माहिती दिली. एकाच दिवशी या कारचा वापर करून बुलडाणा आणि जालन्यात चोरी झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या कारचा शोध घेण्यास सुरुवात केली.
सांगली, सोलापूरच्या पोलिसांनी घेतली गंभीर दखल
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अशा वर्णनाच्या कारचा तपास घेणे सुरू झाले, सांगली, कोल्हापूरच्या पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि नाकाबंदी ही केली. मात्र या कारचा शोध घेण्यात त्यांना अपयश आले. दरम्यानच्या काळात जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा चंग बांधला. आणि सुरू झाला स्थानिक गुन्हा शाखेच्या टीमचा प्रवास. 2 तारखेला ही घटना घडल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने लगेच प्रवासाला सुरुवात केली आणि या गाडीच्या मागावर ते निघाले. राज्यातील विविध जिल्हे तपासून पाहिले नगर, अकोला, गोवा, बेंगलोर, अशा अनेक ठिकाणी तपास केल्यानंतर ही गाडी मध्यप्रदेशमधील इंदोर येथे असल्याचा सुगावा जालन्याच्या पथकाला लागला आणि त्यांनी इंदोर गाठले. पाच दिवस इंदोरमध्ये ठाण मांडून बसल्यानंतर या प्रकरणातील चोरटा पवन उर्फ भुरा रामदास आर्या 35 हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती लागला. त्याच्या राहत्या घरातून 16 तारखेला पोलिसांनी त्याला जालन्यात आणले.
चोरटा करत होता दिवसा चोऱ्या
बहुतांश चोऱ्या आणि घरफोड्या या रात्री होतात, मात्र या पवन उर्फ भूरा रामदास आर्याची सवय ही दिवसा घरफोड्या करण्याची होती. याबद्दल बोलताना पवन ने पोलिसांना सांगितले की, "जे लोक रात्री बाहेरगावी असतात त्यांच्या घरामध्ये दागदागिने आणि सोने, रोख रक्कम राहत नाही ते सोबत घेऊन जातात किंवा इतरत्र व्यवस्था करतात. मात्र जे लोक दिवसभरासाठी बाहेरगावी जातात त्यांच्या घरामध्ये सोने, दागिने, रोख रक्कम तशीच असते, म्हणून ती लंपास करणे सोपे जाते. आणि कोणी हटकले तरी सहज भेटायला आलो असे म्हणत समोरच्याला टाळता येते. लोकही फारसे लक्ष देत नाहीत, त्यामुळे एका शहरात चोरी केल्यानंतर लगेच तिथून दुसर्या शहरात जायचो आणि घरफोडी करायचो"
पवन आर्याआहे मनमौजी
'असा' होता या चोरट्याचा दिनक्रम
वयाच्या सुमारे विसाव्या वर्षी घराच्या बाहेर पडलेला भुरा उर्फ रामदास आर्या इंदोर येथे एकटाच राहायचा, आई-वडिलांपासून दुरावत गेल्यामुळे त्याच्याशी फारसे कोणाचे संबंध नव्हते, तो अविवाहित आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून तो हा उद्योग करायचा, त्यामुळे आठ दिवस अशा घरफोड्या करत फिरायचं आणि मिळवलेला ऐवज गोव्यामध्ये आणून मनमोजी पद्धतीने खर्च करायचा. हा पैसा संपला की पुन्हा घरफोड्या सुरु, असा त्याचा दिनक्रम असायचा.
आरोपीवर इंदोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत गुन्हे
भुरा उर्फ रामदास आर्या याच्यावर इंदोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता कारण तो घरफोड्या करण्यासाठी महाराष्ट्रात यायचा आणि त्या झाल्या की परत गोव्याला जाऊन उधळपट्टी करायचा. आणि पुन्हा कधीतरी इंदोरमध्ये जाऊन राहायचा. त्यामुळे त्याचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश येत होते.
स्थानिक गुन्हा शाखेचे अथक परिश्रम
पंधरा दिवसांमध्ये 6 हजार 700 किलोमीटरचा प्रवास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीला पकडले आहे. पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांनी देखील या पथकासोबत फिरून वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे .पंधरा दिवस फिरलेल्या पथकामध्ये या शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपूत, पोलीस हेडकॉन्स्टेबल सॅम्युअल कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर एडके, पोलीस नाईक गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तगे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत बेर्डे ,सचिन चौधरी, संदीप मांटे, देविदास भोजने, विलास चेके, महिला पोलीस मंदा बनसोडे ,शमशाद पठाण, यांचा समावेश होता. पंधरा दिवसात फक्त हे पथक एक दिवस घरी आले होते.
प्रत्येक वेळेस जोडीदार बदलायचा
पकडल्यानंतर जेलमध्ये गेल्यावर हा नवीन जोडीदार शोधायचा. त्याच्यासोबत घरफोड्या करायचा आणि त्या जोडीदाराला सोडून देऊन पुन्हा नवीन जोडीदार शोधायचा, त्यामुळे पोलिसांना देखील याचा ठावठिकाणा लागत नव्हता. आंतरराज्य टोळीतील हा गुन्हेगार महाराष्ट्र पोलीस दलातील जालना येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे. त्यामुळे या पथकाचे फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर अन्य राज्यातून देखील कौतुक होत आहे.