जालना - कोरोना संकटामुळे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर लोकप्रतिनिधी, अधिकारी सर्वांनीच भीती घेतलेली आहे. खबरदारी म्हणून औरंगाबाद जालना सीमेवर असलेल्या बदनापूर चेकपोस्टवर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. औरंगाबाद जिल्हा रेड झोनमध्ये तर, सदरचा महामार्ग रस्ता असल्याने मुंबई, पुण्याकडून वाहने येत असतात. त्यामुळे, या चेकपोस्टवरील अधिकाऱ्यांना डोळ्यात तेल घालून जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
या ठिकाणी जालना जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे तब्बल २० दिवसांपासून कर्तव्य बजावत आहेत. महामार्ग असल्यामुळे विविध ठिकाणच्या लोकांशी, वाहनांशी संपर्क येत असतो. त्यामुळे, त्यांनी आपले कुटुंब गावाकडे नेऊन सोडले आणि सध्या ते एकटे रहात आहेत. कोरोना संसर्गावर विजय मिळवण्यासाठी पोलीस दल करत असलेला असा त्याग खरोखर कौतुकास्पद आहे.
जालना जिल्हा विशेष शाखेत पोलीस उपनिरीक्षक असलेले बहुरे यांचे मुळगाव हे बदनापूर तालुक्यातील सागरवाडी आहे. गावात आई-वडील राहतात तर, बहुरे हे पत्नी व मुलासोबत जालना येथे मुख्यालयी राहतात. परंतु, कोरोना रोगाचे संकट आल्यापासून बहुरे यांची नेमणूक वरुडी येथील चेक पोस्टवर झाली आहे. या ठिकाणी सकाळी 8 वाजता ते तपासणी कामी रुजू होतात आणि त्यानंतर 12 तास येथे सेवा देतात. डब्बा आणून जेवणही येथेच करतात. येथे विविध ठिकाणाहून येणाऱ्या वाहनाशी त्यांचा संपर्क होतो. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेऊनही एखादा कोरोनाग्रस्त संपर्कात येऊन आपल्यापासून कुटुंबाला याचा त्रास होऊ नये म्हणून बहुरे यांनी कुटुंबाची काळजी म्हणून पत्नी, मुले, सून व नातवाला गावी सागरवाडी येथे नेऊन सोडले व एकटे राहण्याचा निर्णय घेऊन स्वतःला कर्तव्यासाठी झोकून दिले.
औरंगाबाद व जालना जिल्ह्याची हद्द ही बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांच्या आदेशाने बदनापूर पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा विशेष शाखेचे पीएसआय शिवसिंग बहुरे यांची बदनापूर चेकपोस्टला नियुक्ती झाली. सदर ठिकाण हे अत्यंत जबाबदारीचे आहे. जिल्ह्याची सीमा बंद असल्याने या ठिकाणाहून जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा वाहनांची योग्य ती खात्री करण्याची व तपासणीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बहुरे पार पाडतात. अनेकदा १२ तासांहून अधिक वेळ ड्युटी होते. मात्र, कोरोनाला जिल्ह्याच्या हद्दीत येऊ द्यायचे नसल्याने बहुरे या सहकाऱ्यांसह दक्ष असतात.
कोरोनामुक्तीसाठी ड्युटी करताना बहुरे यांना अनेकदा कुटुंबियांशी बोलायला वेळ मिळत नाही. नातवाशी बोलायचे तर व्हिडिओ कॉल करून मी तुझ्यासोबत खेळायला येईल, अशी समजूत घालावी लागते. सद्य परिस्थितीत कोरोना लढ्यात अशा कर्तव्यदक्ष पोलिसांमुळेच जालण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकलेला नाही. याबाबत जालना पोलीस कौतुकास्पद काम करत असल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे.
याबाबत बोलताना बहुरे म्हणाले, औरंगाबाद व जालना जिल्हा सीमेवर कोरोना संकटामुळे वाहन तपासणी करण्यासाठी आणि येणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यासाठी चेकपोस्टवर मला जबाबदारी देण्यात आलेली आहे. सलग २० दिवसांपासून या चेकपोस्टवर कार्यरत आहे. सदर चेकपोस्ट मुंबई, पुणे व औरंगाबाद रेड झोनशी संबंधित असल्याने २० किमी अंतरावर असलेल्या गावी माझे कुटुंब असतानादेखील त्यांच्या आरोग्यासाठी भेटीला जात नाही. जनतेच्या आरोग्यासोबत कुटूंबाची काळजी घेणे देखील आवश्यक असल्याने मी सध्या एकटा राहुन माझी जबाबदारी पार पाडतो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.