जालना - जिल्ह्यातील लष्करी जवानाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. चंद्रकांत महादेव सुळे असे या जवानाचे नाव असून अंबड तालुक्यातील भगवान नगर येथील ते रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार जवान चंद्रकांत सुळे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर काश्मीरमध्येच अंत्यविधी करण्यात येणार आहे.
अंबड तालुक्यातील भगवाननगर येथे चंद्रकांत यांचे आई-वडील, दोन बहिणी आणि दोन भाऊ असे कुटुंब आहे. त्यापैकी दोन्ही बहिणींचा विवाह झालला आहे. जवान चंद्रकांत सुळे हे काश्मीरमध्ये 216 मेडियम रेजिमेंट तोफखाना या युनिटमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती भगवान नगर येथे कळाल्यानंतर चंद्रकांत यांचे वडील महादेव आणि अन्य दोन नातेवाईक रात्री काश्मीरकडे रवाना झाले आहेत.
चंद्रकांत सुळे यांची 2012- 13 मध्ये सैन्यदलात निवड झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. चंद्रकांत सुळे यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले होते. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांची तपासणी केली असताना कोरोनाची लक्षणे आढळली. त्यामुळे त्यांचा मृतदेह जालन्यात आणण्यात येणार नाही. काश्मीरमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील अधिकृत कोणतीही माहिती जालना येथील माजी सैनिक कार्यालय किंवा औरंगाबाद विभागाचे मुख्यालय असलेल्या औरंगाबाद येथील कार्यालयाकडून मिळू शकली नाही.