जालना - गेल्या 17 दिवसांपासून गायरान जमिनीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या, कारभारी अंभोरे यांच्या उपोषणाने वेगळे वळण घेतले आहे. आज मंगळवारी उपोषणाचा 17 वा दिवस असतानाही हे उपोषण न सुटल्यामुळे, त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि मध्यस्थी करणाऱ्या संजय देठे या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे उपोषण अधिकच चिघळले आहे.
तीन दिवस शासकीय रुग्णालयात राहिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषणकर्त्याला आज पुन्हा उपोषणस्थळी आणले. त्यासोबत पोलीस फौजफाटा आला. त्यानंतर, पोलिसांनी उपोषण कर्त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि अध्यात्मिक महाराजांचीही मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना यामध्ये यश आले नाही. उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
दुपारी अडीचच्या सुमारास, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या आपचे कार्यकर्ते तथा एका संस्थेतील क्रीडाशिक्षक संजय देठे यांना बोलावून चौकशी केली. हे करीत असतानाच देठे यांना गाडीत बसवले. परंतु, त्याच वेळी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लोकांनी खिरडकर यांच्या गाडीला घेराव घालून देठे यांना गाडीच्या बाहेर काढले. याच दरम्यान देठे यांचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला असल्याचा आरोप देठे यांनी केला आहे.
या घडामोडीनंतर उपोषणकर्त्यांना पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांनी सोबत आणलेल्या टेम्पोला दोऱ्या बांधून निवाऱ्याची व्यवस्था केली.