जालना - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्यासाठी राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी खेळ सुरू केला आहे, असा आरोप माजीमंत्री बबनराव लोणीकर यांनी केला.
यावेळी ते म्हणाले, 12 लाख 50 हजारपेक्षा अधिक सदोष असणाऱ्या आरटीपीसीआर किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. या खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला, असा आरोपही लोणीकर यांनी केला. यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही बबनराव लोणीकर यांनी केली.
कोरोना संसर्गाच्या कालावधीदरम्यान अँटीजेन आणि आरटीपीसीआर अशा दोन प्रकारच्या चाचण्या प्रामुख्याने केल्या जातात. त्यातील अँटीजेन चाचणी केल्यानंतर प्रमुख्याने 06 ते 15 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर निदान होते. मात्र, आरटीपीसीआर चाचणीमध्ये 30 टक्के खात्रीशीर निदान केले जाते, अशी मान्यता आहे. त्यासाठी 12 लाख 50 हजार कीट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र, नव्याने खरेदी करण्यात आलेल्या या किटमध्ये अनेक दोष आढळून आले आहेत. प्रत्यक्ष कोरोना रुग्णांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला. तसेच या किट्स सदोष असल्याबाबत विचारणा केली. यानंतर त्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे.
कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी आलेल्या या किट्स या सदोष असल्याचे लक्षात आले आहे. आरटीपीसीआर लॅबोरेटरीमध्ये गेल्या 5 ऑक्टोबरपासून या किट्सचा वापर केल्यानंतर जालन्यात कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाचा अहवालही निगेटिव्ह येत आहे. आयएमसीआरच्या तपासणीमध्येही हे सिद्ध झाले आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.
कोरोनाबाधितांना नकारात्मक रिपोर्ट मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उपचार केला जाणार नाही. त्यात आणखी गंभीर बाब म्हणजे नकारात्मक रिपोर्ट मिळाल्यानंतर हे रुग्ण बिनधास्तपणे बाहेर फिरणार आहेत. त्यांच्यामुळे इतरांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण खूप भयानक असणार आहे. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही लोणीकर यावेळी म्हणाले.
तर या संदर्भात प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, सध्या लोणीकरांना काही काम नाही. त्यामुळे ते असे आरोप करत आहेत. या किट खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे राज्य शासनाचा या किट खरेदीसोबत काही संबंध नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले.