जालना - "नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने " ही म्हण जालना पालिकेच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. भ्रष्टाचाराच्या संदर्भात वारंवार चर्चेच्या भोवऱ्यात असलेल्या जालना नगरपालिकेवर पाच सदस्यीय समितीच्या माध्यमातून शुक्रवारी चौकशी सुरू होणार होती. मात्र 24 तारखेपासून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने ही चौकशी लांबली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये आणि औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून जालना नगरपालिकेतील भ्रष्टाचारांच्या अनेक विषयांवरही चौकशी होणार होती. या चौकशीत नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे म्हणणे मांडले. सदर चौकशी ही राजकीय द्वेषभावनेने प्रेरित होऊन व राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या भाच्याला पुढे करून लावल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. त्यामुळे या चौकशीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. शिवाय याविषयाची सर्वत्र चर्चा देखील होती. परंतु दोन दिवसापूर्वीच जालना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांची राज्यपालांनी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे बदली केली. फक्त बदलीच केली असे नव्हे तर त्यांना त्याच दिवशी कार्यमुक्तही केले. त्यामुळे आपोआपच खांडेकरांच्या जालना नगरपालिकेतील कामाचा अधिकार कमी झाला.
त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन नार्वेकर यांची जालन्याला बदली झाली. मात्र ते देखील दोन दिवस हजर झाले नाहीत. त्यामुळे ही चौकशी करायची कोणाची? आणि कोणासोबत हा विषय सर्व अधिकाऱ्यांना पडला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे जालना नगरपालिकेची होणारी चौकशी किमान आठ दिवस तरी पुढे ढकलली गेली आहे. त्यामुळे आता संतोष खांडेकर यांचा विषय बंद झाला असून नूतन मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी पदभार स्वीकारल्यामुळे नार्वेकर पर्व सुरू झाले आहे.