जालना - नवीन औद्योगिक वसाहत फेज-3 मध्ये असलेल्या एलजी बालकृष्ण अंड ब्रदर्स या कंपनीच्या व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये शनिवारी वाद झाला. त्यामुळे दिवसभर कामगारांनी कंपनीसमोर ठिय्या आंदोलन करुन काम बंद पाडले. दिवसभर तणावाचे वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान आमदार कैलास गोरंट्याल व कामगार आयुक्त यांनी कामगार आणि व्यवस्थापनाच्या भेटी घेऊन समन्वयाने मार्ग काढल्यामुळे हा वाद तूर्तास मिटला आहे.
हेही वाचा - चंद्रपूर : लाखोंच्या दारू साठ्यावर चालवला रोड रोलर
एलजी बालकृष्ण अँड ब्रदर्स या नावाने कोईमतूर येथे मुख्य कार्यालय असलेली कंपनी जालना येथे कार्यरत आहे. या कंपनीमध्ये बेरिंग, चैन, आणि दुचाकी-चारचाकींना लागणारे अनेक सुटे भाग तयार होतात. त्यासाठी सुमारे दीड हजाराच्या जवळपास कामगार येथे कामाला आहेत. त्यापैकीच एका पवार नावाच्या ऑपरेटरने सकाळी दोन वेळा नाश्त्यासाठी वेळ खर्ची केल्यामुळे व्यवस्थापनाने त्याला कारणे दाखवा नोटीस दिली. मात्र, पवार याने ती न स्वीकारल्यामुळे व्यवस्थापनाने त्याला प्रवेश बंदी केली. पवार हे 'सीटू' या कामगार संघटनेशी सलग्न असल्यामुळे अन्य कामगारांनी देखील काम बंद पाडले.
जे कामगार कंपनीत जात होते अशा नाही त्यांनी रोखून धरल्यामुळे बराच तणाव वाढला होता. औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या सर्व प्रकाराची दखल घेऊन आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्या भेटी घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार अधिकारी व कामगार आयुक्त यांनीही हा तिढा सोडविण्यासाठी प्रयत्न केला .त्यामुळे रात्री सात वाजेच्या सुमारास हा तिढा सुटला आहे. दरम्यान दिवसभर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चंदंजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोठाळे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह कंपनीमध्ये ठाण मांडून बसले होते.
हेही वाचा - घडनावळीसाठी दिलेले 1 कोटी 42 लाखांचे सोने घेऊन कारागीर फरार