जालना - राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी खात्याच्या भरारी पथकाने रात्री दोन संशयित वाहनांना पकडले. तीन तासांच्या झडतीनंतर या दोन्ही ट्रकमध्ये काहीच आढळून आले नाही. त्यामुळे जालना आणि औरंगाबादच्या भरारी पथकाला परत फिरावे लागले. त्यांचे हे धाडसत्र फुसका बार ठरले.
संयुक्त कारवाईची मोहीम
एका ट्रकमध्ये चोरट्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती औरंगाबादच्या राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार ही माहिती त्यांनी जालन्याच्या भरारी पथकाला देऊन या दोन पथकाने संयुक्त कारवाईची मोहीम सुरू केली. ट्रकच्या मागे औरंगाबाद येथील भरारी पथक लागले आणि जालन्यातील भरारी पथक यांच्या मागावर होतेच. या दोन्ही पथकांनी दोन पांढऱ्या रंगाच्या ट्रकला जालना-औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरातील पथकर नाक्याजवळ पकडले. हे ट्रक पूर्णपणे सामानाने भरलेले असल्यामुळे रस्त्यावरच त्याची तपासणी करणे चुकीचे वाटल्यामुळे या पथकाने हे दोन्ही ट्रक सर्वे नंबर 488मध्ये असलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाच्या कार्यालयासमोर आणून उभे केले, तोपर्यंत नऊ वाजले होते. राज्य उत्पादन शुल्कच्या जालना येथील अधीक्षिका भाग्यश्री जाधव यादेखील या पथकासोबत होत्या. रात्री नऊच्या सुमारास या ट्रकमधील सामान उतरण्यास सुरुवात झाली.
चहा आणि औषधांचा ट्रक
एका ट्रकमध्ये चहा पावडरचे गठ्ठे निघाले तर दुसऱ्या ट्रकमध्ये औषधे निघाली. दोन्ही ट्रक दिसायला सारखेच होते. अधिक चौकशी केली असता आणि या ट्रकची पाहणी केल्यानंतर चहा पत्तीचा ट्रक औरंगाबाद येथून नागपूरकडे जाऊ लागला तर औषधाने भरलेला दुसरा ट्रक औरंगाबादकडून बंगळुरू येथे जात होता. लुपिन कंपनीचे यामध्ये सामान होते. रात्री अकराच्या सुमारास या दोन्ही ट्रकमधील साहित्याची शहानिशा झाल्यानंतर भरारी पथकाचे अधिकारी आपापली कारवाई करून रिकाम्या हाताने परतले. औरंगाबाद येथील भरारी पथकाचे विभागीय निरीक्षक लीलाधर पाटील तर जालना येथील भरारी पथकाचे निरीक्षक सूरज गायकवाड यांच्यासह दुय्यम निरीक्षक परतूर आणि अन्य दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांनी या छाप्यामध्ये तपासणी केली.
जबाबदार कोण?
एका ट्रकमध्ये चहापत्तीचे बॉक्स होते आणि त्यातच रात्री दहाच्या सुमारास पावसालाही सुरुवात झाली. त्यामुळे या बॉक्सचे नुकसान होऊ नये, म्हणून राज्य उत्पादन शुल्कच्या कार्यालयातच काही वेळापुरते ठेवावे लागले. दरम्यान, वाहनासोबत एकच चालक असल्याने या चालकाचे मात्र हाल झाले होते. आधी सामान उतरून पुन्हा चढवावे लागल्यामुळे हा चालक घामाघूम झाला होता. केवळ संशयाच्या जोरावर वाहनांची अशी कसून तपासणी केल्यामुळे वाहनचालकांचा वाया गेलेला वेळ आणि सामान चढ-उतार करण्यासाठी केलेली मेहनत या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.