जालना - राज्यात सध्या कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामध्ये काही ठिकाणी कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्णही आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. जालना शहरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला प्रतिबंध घालण्यासाठी शहरात दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दोन शिक्षक एक पोलीस कर्मचारी आणि एक नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे पथक कोरोना नियमांचे उल्लघन करणाऱ्यावंर दंडात्मक करवाई करणार आहे.
दहा पथकांची स्थापना, करणार दंडात्मक कारवाई
जालना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतना नागरीक बेफिकरीने वागत आहेत. या गोष्टींना आळा घालण्यासाठी दहा पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून एका पथकामध्ये दोन शिक्षक, एक पोलीसकर्मचारी आणि एक नगरपालिकेचा कर्मचारी असणार आहे. हे चार जणांचे पथक शहरामध्ये विविध चौकांमध्ये उभे राहून मास्क शिवाय फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहे. विना मास्क पाचशे रुपये, विना मास्क व्यवसाय करणाऱ्याला व्यावसायिकाला दोन हजार रुपये, मंगल कार्यालय चालकांना दहा हजार रुपये, अशी दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे.
कोरोना महामारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना आता दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मंगळवारी सकाळीच उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर मंडलाधिकारी भोरे यांनी स्वतः गांधीचमन परिसरात उभे राहून सहकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या ,आणि लगेच दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे.
आढावा बैठकीनंतर लगेच अंमलबजावणी -
जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बारा वाजताही बैठक संपल्यानंतर लगेचच या दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी पोलीस आणि महसूल प्रशासन रस्त्यावर उतरले, आणि विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू केली.