जालना - जिल्ह्यातील भोकरदनजवळील जोमाळा व भायाडी शिवारात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भोकरदन-जालना रस्त्यावरील दोन हॉटेलच्या पाठीमागील शेतात दोन ठिकाणी 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी शिवाजी बर्डे, कैलास फुके यांना ताब्यात घेतले. त्यांना माल पुरवणारा टेंभूर्णी हद्दीतील गव्हाण संगमेश्वर येथील सतीश ढवळे याला देखील त्याच्या घरातून ताब्यात घेतले. तसेच रात्री भायडी शिवारात एका लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये देशी दारूचा बॉक्ससाठा असलेल्या ठिकाणी छापा टाकून ४२ हजार रुपये किंमतीच्या देशी दारूच्या ७६८ बॉटल जप्त केल्या. आरोपी नितीन एकनाथ दसपुते याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून धडक कारवाई केली.
ही कार्यवाही जालना पोलीस अधीक्षक एस चैतन्य, अपर पोलीस अधिकारी समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल जायभाये, पो. ना. रामेश्वर सिनकर, जगदीश बावणे, पो. कॉ. गणेश पायघन, सागर देवकर, निलेश फुसे, एकनाथ वाघ, चालक लक्ष्मण वाघ यांनी केली.