जालना - जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांमध्ये होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्यातीलच ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राचे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे तेथील ठेकेदार नागरे यांचे नाव काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जालना जिल्हा परिषदेचे सदस्य जयमंगल जाधव यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत केली.
त्याच सोबत अन्य सदस्यांनीही अशा तक्रारी केल्यामुळे जिथे जिथे निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. ते काम करणारे ठेकेदार आणि संबंधित विभागाचे उपअभियंता यांची चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी आज दिले. जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये आज स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांच्यासह सर्व समित्यांचे सभापती उपस्थित होते.
9 सप्टेंबरला तहकूब करण्यात आलेली स्थायी समितीची बैठक दिनांक 10 ऑक्टोबरला घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये घेतलेल्या सर्व निर्णयांना आज सभागृहाने मंजुरी दिली. आजच्या या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकामे होत असलेल्या ठिकाणांचे जिल्हा परिषद सदस्य शालिग्राम मस्के, अवधूत खडके, जयमंगल जाधव यांनी तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.